मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात वाढणारा. मुरमाड, दगड गोटे असलेल्या, मध्यम प्रतीच्या, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढतो. साधारण साठ ते सत्तर फुट उंच वाढतो. आटोपशीर व साधारण पर्णसंभार असतो. पानगळ होणारा वृक्ष. खोड सरळ उंच वाढणारे. खोडावर उभे आयात आकृती चे खवले असतात, साल काळी व जाड असते. खवल्यांच्या अश्या झालेल्या रचनेमुळे खोड छान दिसते. खोडा कडे बघितल्यास सादडाचे झाड आहे हे लक्षात येते. पान एकांतरीत, सहा ते दहा इंच मोठी तिन ते पाच इंच रुंद, लंब गोलाकार , खडबडीत व चिवट असतात. हिवाळ्याच्या शेवटी पानगळ सुरू होते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला झाड निष्पर्ण होतो. उन्हाळ्यात नवीन पालवी बरोबरच झाड मोहरु लागतात. पानांनच्या जवळ पिवळसर पांढऱ्या छोट्या फुलांचे लांबट तुरे संख्येने येतात. फुलांना सुगंध असतो. जवळून फुलांचे निरीक्षण केल्यास फुलांची सुंदर रचना लक्षात येते. फुलांचा असंख्य तुर्यांमुळे झाड खूप छान दिसतात. फुलांचा बहर पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत सुरू असतो. पावसाळ्याच्या शेवटी झाडावर हिरवी दीड एक इंच लांबट व तेव्हढेच रुंद फळ दिसु लागतात. फळांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. फळ उभट व बाजूने पाच पातळ पंख असतात. परिपक्व फळ फिकट तपकिरी रंगाची होतात. फळ हिवाळ्याच्या शेवटी गळू लागतात. काजव्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या झाडांपैकी सादडा हे एक महत्त्वाचे झाड. ह्या वृक्षा मुळे काजव्यांसाठी पोषक वातावरण तयार होते.पर्यावरणीय परिसंस्था अबाधित राखण्यास उपयुक्त. औषधी गुणधर्म असलेला वृक्ष.