निर्मळी

strychnos potatorum

मध्यम पावसाच्या प्रदेशात, उष्ण कोरड्या, दमट हवामानात, वाढणारा सदाहरित किंवा परिस्थितीनुसार पानगळ होणारा, मध्यम उंचीचा वृक्ष. पाण्याचा निचरा होणाऱ्या, चांगल्या प्रतीच्या जमिनीत वाढतो. खोड साधारण सव्वा ते दिड फुट व्यासाचे, बुंधा फारसा उंच नसतो. साल काळ्या रंगाची भेगाळलेली असते. फांद्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने वाढलेल्या आढळतात. पाने सम्मुख, साधी, दोन ते तीन इंच लांब, एक ते दोन इंच रुंद लांब वर्तुळाकृती व टोकदार असतात. पाने गर्द हिरवी चकचकीत व गुळगुळीत असतात त्यावर बुडापासून निघालेल्या शिरा उठून दिसतात. पाने देठ नसलेली.अतिउष्ण कोरड्या भागात एप्रिल मध्ये पानगळ होते व जुन मध्ये नवीन पालवी येण्यास सुरुवात होते, तर काही भागात अल्पकाळासाठी पानगळ होते. पानगळ होतांना पाने पिवळी होऊन झाडावर लटकलेली असतांना वृक्षाचा पिवळा पर्ण संभार दिसून येतो. फुल छोटी सुगंधी , घंटीच्या आकाराची, पांढरट हिरवट रंगाची एप्रिल मे महिन्यात येतात. फुलं गुच्छाने पानांच्या बगलेत येतात. फळ गोल साधारण अर्धा इंच व्यासाची असतात. फळधारणा साधारण पावसाळ्याच्या शेवटी होते. हिरवी फळ हिवाळ्यात परिपक्व झाल्यानंतर काळपट तपकिरी रंगाची होतात. फळांमध्ये गर असतो ,त्यात एक किंवा दोन बिया असतात. ह्या बियांच वैशिष्ट्य म्हणजे पाणी शुद्ध(निर्मळ)करण्यासाठी यांचा वापर होतो. म्हणून ह्याचे नाव निर्मळी. सुरवातीला काहीसा हळू वाढणारा, औषधी गुणधर्म असलेला वृक्ष.

identity footer