पावसाळ्याचा अपवाद वगळता आठ महिने निष्पर्ण असलेला वृक्ष कहांडळ, त्याचे शास्त्रीय नाव आहे स्टरक्युलिया युरेन्स डोंगरमात्यापासून पायथ्यापर्यंत, कडाकपरीमध्ये खडकाळ मुरमाड जमिनीवर चांगल्या प्रकारे तीस एक फुटापर्यंत वाढणारा पांढऱ्या सालीचा, सालीचे पापुद्रे गळून पडल्यानंतर हाताला गुळगुळीत पांढरे खोड लागणार्या वेड्यावाकड्या पसरलेल्या फांद्यांचा, रात्री चंद्राच्या उजेडात बघितल्यास लांबून पटकन लक्षात येणारा हा देखणा वृक्ष, पान फांद्यांच्या टोकाला गर्दी करणारी, एरंडाच्या पानासारखी दिसणारी,दहा ते बारा इंच मोठी, खालच्या बाजूने लव युक्त असतात. हिवाळ्याच्या सुरुवातीला पानगळ होऊन फांद्यांच्या टोकाला सूक्ष्म फुलांची हिरवट पिवळट रंगाचे गुच्छ येतात. जवळ गेल्याशिवाय ते फुल आहेत हे कळत नाही. उन्हाळ्याच्या सुरुवातीला फळ येण्यास सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात हिरवी असलेली पाच बोंड एकत्रित असलेले फळ, परिपक्व होतात जांभळट लाल केसाळ आवरण असलेली ही फुलं आहेत की काय असा प्रश्न काही काळ फळांकडे बघितल्यास पडतो. परिपक्व झाल्यावर चॉकलेटी रंगाचे केसाळ मखमली आवरण दिसते. या फळांना चुकून हात लागल्यास त्यावरचे केस खाचकुवहिलीच्या कुसळासारखे हाताला टोचतात. या वृक्षापासून मौल्यवान असा डिंक उपलब्ध होतो. बहुउपयोगी औषधी गुणधर्म असलेला महत्त्वाचा हा वृक्ष वृक्षारोपण करताना योग्य ठिकाणी आवर्जून त्याची रोपांची लागवड करावी.