जंगली बदाम

sterculia foetida

मध्यम,जास्त पावसाच्या प्रदेशात वाढणारा वृक्ष.उष्ण,कोरड्या हवामानात वाढतो. आपल्याकडे म्हणजे नाशिक जिल्ह्यात याचा नैसर्गिक अधिवास नाही. शासकीय स्तरावर, रस्त्याच्या कडेला, उद्यानांमध्ये लागवड केलेली आहे. आपण पण ह्याची बर्याच ठिकाणी लागवड करून जोपासना केली आहे. वृक्ष परिचय केंद्र, नासिक देवराई, नासिक वनराई मध्ये पण लागवड केली आहे. उंच सरळ साठ ते सत्तर फुट वाढणारा पानगळ होणारा वृक्ष. खोड सरळ उंच वाढलेले, तपकिरी राखाडी रंगाची साल असते. फांद्या खोडाभवती अंतराअंतराने फुटुन साधारण पंधरा ते वीस फुटापर्यंत आडव्या पसरलेल्या असतात. वृक्ष जसा उंच होत जातो तश्या फांद्या गळत जाऊन नवीन फांद्या शेंड्याकडील भागात असतात. त्याच्या ह्या रचनेमुळे वृक्ष उंचपुरा भारदस्त दिसतो. पान फांद्यांच्या शेंड्याकडे एकवटलेली असतात.पान लांब देठाची , देठाच्या टोकाला सात ते नऊ पर्णिका वेगवेगळ्या दिशेला पसरलेल्या असतात. दोन्ही कडे निमुळत्या, टोका कडे लांबट टोक निघालेले असतात. नवीन कवळी पालवी तांबूस रंगाची असते. पानगळ हिवाळ्यात होते. व नवीन पालवी हिवाळ्याच्या शेवटी येण्यास सुरुवात होते. पानगळ होऊन निष्पर्ण झालेल्या वृक्षावर लालसर रंगाच्या सुंदर रचनेच्या छोट्या फुलांचा गर्दीने पूर्ण झाड बहरून जाते. फुलांबरोबर लालसर रंगाच्या काजुच्या आकाराची मोठी लटकलेली फळ काही उकलेली फळ त्यातून डोकावणार्या बिया काही बिया फळाच्या बाहेर लटकलेल्या असतात. काही फळ बिया पडुन गेल्या मुळे बोळकी झालेली असतात. हा सर्व सुंदर नजारा नजरेने टिपण्यासाठी साठी मानेला कळ लागते. परिपक्व झालेली फळ हि आदल्या वर्षीची असतात. फळांना परिपक्व होण्यासाठी न‌ऊ दहा महिन्याचा कालावधी लागतो. फुल सुंदर असली तरी त्यांना दुर्गंधी असते. नवीन फळ उन्हाळ्याच्या सुरुवातीला येण्यास सुरुवात होते. हिरवी फळ पानांनच्या गर्दी मुळे लवकर लक्षात येत नाही. फळ ज्यावेळी पक्व होऊन लाल रंगाची होतात त्यावेळी हिरव्या पानांन मधुन उठून दिसतात.औषधी गुणधर्म असलेला हा वृक्ष.

identity footer