आमोनी हे उष्ण,कोरड्या हवामानात, कमी पावसाच्या प्रदेशात वाढणार झुडूप. मुरमाड, रेताड, हलक्या प्रतीच्या जमिनीत वाढते. डोंगर उताराला, काटवन वनात आढळते. आमोनी हे पानगळ होणारे, काटेरी झुडूप आहे.आठ ते दहा फुटा पर्यंत वाढते. ह्याचा विस्तार वेडावाकडा असतो. पान बेलाच्या पाना सारखी, त्रिदल युक्त, संयुक्त पध्दतीचे असतात. टोकाची पर्णिका बाजुच्या दोन पर्णिकांपेक्षा मोठी असते. टोकाची पर्णिका साधारण अडीच ते तीन सेंटीमीटर देठाकडे निमुळती व टोकाकडे पसरट गोलाकार असते.खालच्या दोन पर्णिका छोट्या व टोकाच्या पर्णिकेच्या देठालाच चिटकलेल्या असतात. पर्णिकांच्या कडा कतरी असतात.पान चुरगळुन नाका जवळ धरल्यास सुगंध येतो. बारीक पिवळसर मंजिऱ्यांचे लोंबकळणारे तुरे पानांच्या टोकाला येतात. जानेवारी फेब्रुवारीत फुल येतात. फळ मिरीच्या आकाराची लालसर गोल गुळगुळीत फेब्रुवारी मार्च मध्ये येतात. परिपक्व फळ पक्षांना आवडतात. एप्रिल मध्ये वाळलेली गडद तपकिरी रंगाचे सुरकुतलेली फळ गळून पडतात. ह्या झुडपा पासून रंग मिळतो. नासिक जिल्ह्याच्या उत्तरे कडच्या भागात, नैसर्गिकरीत्या काही ठिकाणी हे वनात आढळते.पण आता बर्या पैकी कमी होत आहे. ह्याचे काही बियाणे मिळवून रोप तयार करून आपण देवराई व वनराई येथे काही रोप लावली आहेत.आजुन बियाणे मिळवून काही नर्सरीमध्ये रोप तयार करण्यासाठी दिले आहेत.