नैसर्गिक रित्या जास्त पावसाच्या प्रदेशात आढळणारा वृक्ष. पण विविध प्रकारच्या हवामानात व प्रदेशात, मातीचा स्तर चांगला असलेल्या व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढतो. छोटे खाणी सदाहरित वृक्ष. जमिनीच्या प्रकारानुसार साधारण दहा ते पंचवीस फुटापर्यंत वाढतो. आपल्याकडे त्याची पानगळ होते. वाढ हळू होते. जमिनी पासून तिन चार फुटावरच खोडाला फांद्या फुटलेल्या असतात. पान एकाआड एक, मोठी, रुंद आणि दोन्ही बाजूला म्हणजे देठाकडे व टोकाकडे निमुळती मध्यभागी पसरट व टोकाकडे थोडे टोक असलेली असतात. पान गर्द हिरवी व फांद्यांच्या शेंड्याकडे आठ ते दहा च्या संख्येने असतात. फुल ऑगस्ट मध्ये येण्यास सुरुवात होते फुल एक सेंटीमीटर व्यासाची पिवळसर पांढरी पाच केसाळ पाकळ्या असलेली, सुंदर रचनेची असतात. फुलांना दुर्गंधी असते कदाचित त्यामुळे त्याला घाणेरा नाव पडले असेल. फळ एक बी असलेले, जांभळा सारखे लांबट दीड-दोन सेंटीमीटर चे , पिकल्यावर जांबळट रंगाची असतात. पक्षांना व खारुताईंना याचे फळ आवडतात. आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचं कॅन्सरवर गुणकारी औषधी गुणधर्म असलेला हा वृक्ष. नरक्याच्या खोडाला व मुळांना या औषधामुळे आयुर्वेदामध्ये खूप मागणी आहे. चांगली जमीन व पाणी उपलब्ध असल्यास ह्याची शेती किंवा लागवड शेताच्या बांधावर केल्यास चांगला फायदा होईल.