कमळ

nelumbo nucifera

प्रत्येक देशाचे व राज्याचे, तेथील विविध प्रकारच्या झाड, फुल, पक्षी व प्राणी यातील विशिष्ट प्रकारच्या प्रजातींना, त्याभागातिल पर्यावरणीय व भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांचे महत्त्व असल्या कारणाने त्यात्या भागांसाठी निसर्गा चे मानचिन्ह म्हणून मान दिला गेला आहे. आपल्या देशाचं फुलांमध्ये राष्ट्रीय पुष्प म्हणून ज्या फुलाला मान मिळाला आहे,ते कमळ पुष्प. कमळ हे दलदलीत येणारे जगात सर्वात सुंदर,पौराणिक आणि औषधी महत्त्व असलेली जल वनस्पती आहे. कमळची पान पातळ आकाराने मोठी गोलाकार कडा झालरी सारख्या वळलेल्या असतात. पानांना लांब देठ असतो. साधारण एक ते चार फूट लांबीचे देठ असल्याने पानं पाण्यापासून साधारण एक ते चार फूट उंच वाढतात. कमळाच्या पानाच वैशिष्ट्य म्हणजे, ह्या पानांवर पाणी थांबत नाही किंवा चिकटत नाही, त्यामुळे पानांना कधी ओलावा अथवा ओलसरपणा नसतो. कमळची पान हिवाळ्यात सुकतात, त्यावेळी कमळकुंड निष्पर्ण होतात. कमळ हिवाळ्यात सुप्तअवस्थेत राहतात. अशावेळी कमळ काकडी काढतात, व भाजी व इतर खाद्य पदार्थ करण्यासाठी वापरले जातात. कमळ काकडी म्हणजे कमळाचे मुळ, ते काकडीच्या आकाराचे लांबट कंद असतात. कमळाला वाढण्यासाठी जेव्हढी मोकळी जागा मिळेल त्यानुसार कमळ फुलाचा व कमळ काकडीचा चांगला आकार आणि विस्तार होतो. कमळाची फुल सूर्यप्रकाशानुसार सकाळी आठ ते न‌ऊच्या दरम्यान उमलतात व साडे तीन ते चार च्या दरम्यान मिटतात. कमळाचे गुलाबी पिवळा, पांढरा हे प्रमुख रंग असतात. फुलांना तीन दिवसाचे आयुष्य असते. फुल मार्च ते सप्टेंबरमध्ये छान फुलतात. पाकळ्या गळून गेल्यानंतर शॉवरच्या आकारा सारखे दिसणारे बोंड दिसतात. त्यामध्ये कमळाच्या बिया असतात. परिपक्व झालेल्या कमळांच्या बियांना कमळगठ्ठा असं म्हटले जाते. कमळ या वनस्पतीचे "सर्वांग" म्हणजेच पानं, फुल, देठ, मुळ, बिया हे औषधी गुणधर्म असल्याकारणाने आयुर्वेदामध्ये विविध औषधांसाठी वापरले जाते. उपयुक्त अश्या ह्या जल वनस्पतीचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत चालले आहेत.

identity footer