जंगली शेवगा

moringa concanensis

कमी पर्जन्यमान होणाऱ्या प्रदेशात वाढणारा, पानगळ होणारा वृक्ष. उष्ण कोरड्या हवामानात डोंगर उताराला, पडीक जमिनीवर, मुरमाड,रेताड, पांढरट ,हलक्या प्रतीच्या जमिनीत वाढणारा वृक्ष. जंगली शेवग्याचे खोड सरळ उंच वाढणारे. खोडाची साल जाडसर, वेडेवाकड्या रेषेत, खडबडीत, भेगाळलेली बुचासारखी असते. पान शेवग्याच्या झाडासारखीच पण थोडेसे जास्त हिरवट असते. पानगळ हिवाळ्यात होते. फुल हिवाळ्याच्या मध्यात येतात. पर्णहिन वृक्षाच्या फांद्यांच्या शेंड्यांना फुलांचे गुच्छ दिसू लागतात. पूर्ण झाड फुलांनी भरलेले खूपच छान दिसते. जंगली शेवग्याच्या फुलांचा देठाकडचा पाकळ्यांच्या सुरुवातीचा भाग लालसर असतो. पांढऱ्या पाकळ्या असलेल्या फुलांचा मधला लालसर भाग व पिवळे पुंकेसर छान उठून दिसतात. फुलण्याचा काळ मार्च अखेरपर्यंत सुरू असतो‌. फुल गळून गेलेल्या जागेवर जंगली शेवग्याच्या हिरव्या शेंगा साधारण नऊ इंच ते अठरा इंच लांब झाडावर लटकतात. पानगळ होऊन बोडक्या झालेल्या झाडावर फेब्रुवारी ते मार्च दरम्यान फुल आणि लटकलेल्या शेंगांचा देखावा बघण्यासारखा असतो. शेंगा एप्रिलमध्ये परिपक्व होतात. शेंगा कडू असतात. खाण्या साठी योग्य नाही. फुल कच्ची खातात, चवीला सुरुवातीला थोडी कडवट,तुरट लागतात, नंतर तिखट लागतात. फुलांची भाजी व चटणी करतात. नेहमीचा शेवग्याचे फुल हे पूर्ण पिवळसर पांढरट रंगाचे असतात फुलांवरून शेवगा कुठला आहे हे लगेच लक्षात येते. जंगली शेवगा आणि खाण्याचा शेवगा यांच्या खोडाच्या सालीमध्ये फरक आहे त्यावरून पण हे कोणतं झाड आहे याची ओळख होते. कमी पाण्याच्या ठिकाणी, डोंगर उतारांना लागवड करून जमिनीची धूप थांबवण्यासाठी योग्य असा वृक्ष.

identity footer