बकुळ

mimusops elengi

मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात वाढणारा वृक्ष. मध्यम प्रतीच्या, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत, जलस्तर चांगला असलेल्या जमिनीत नैसर्गिक रित्या वाढतो, दाट, भरगच्च पर्णसंभार असलेला सुगंधी फुलांचा,सदाहरित वृक्ष. खोड सरळ वाढणारे, काळपट रंगाची, खडबडीत साल असते.लहान मोठ्या फांद्या दाटीने असतात. पान एक आड एक, गर्द हिरव्या रंगाची, तीन एक इंच लांब एक दिड इंच रुंद असतात. पान चककणारी, कडा झालर युक्त असतात. पान देठाकडे गोलसर व टोकाकडे निमुळती टोकदार असतात.पावसाळ्याच्या सुरुवातीला पानांच्या आड पिवळसर पांढरी, छोटी साधारण एक सेंटिमीटर व्यासाची, फुल येतात, फुल झाडाला आली हे त्यांच्या सुंगधामुळे लक्षात येत. परिसर फुलांच्या सुगंधाने दरवळुन जातो. फुलांची रचना सुरेख असते. गळून पडलेल्या फुलांचा सडा जमीनीवर पडतो. फुल वाळल्यावर फिकट तपकिरी रंगाची होतात. वाळलेल्या फुलांचा पण सुंगध येतो. पावसाळ्यात फळधारणा होते.हिरवी चकचकीत, दोन अडीच इंच लांबट, टोकाला निमुळती झालेली फळ असतात. फळ हिवाळ्याच्या शेवटी पिकतात. पिकलेली फळ नारंगी रंगाची असतात व हिरव्या गच्च पानांमधून नारंगी रंगाचे फळ उठून दिसतात.फळ पक्षांना आवडतात. औषधी गुणधर्म असलेला हा वृक्ष. बऱ्याच लोकांना बकुळ नावाचा वृक्ष असतो हे माहीत नाही, हे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा मला जरा धक्काच बसला.जागेच्या उपलब्धतेनुसार, योग्य ठिकाणी ह्या सुवासिक फुले देणार्या वृक्षाची लागवड केल्यास, सुदृढ नैसर्गिक वातावरण निर्माण केल्याचे समाधान मिळेल.

identity footer