गुलाबी बाभूळ

mimosa hamata

गुलाबी बाभूळ छोटे खाणी वृक्ष आहे,काही ठिकाणी झुडूपा सारखे वाढलेले दिसून येते .साधारण दहा फुटापर्यंत वाढतो. कमी पावसाच्या प्रदेशात वाढणारा असून छोटेखानी पण भरपूर प्रमाणात काटे असणारे हा छोटेखानी वृक्ष आहे. उष्ण, कोरड्या हवामानात नैसर्गिक रित्या वाढतो. मुरमाड, रेताड, हलक्या प्रतीच्या जमिनीत समूहाने वाढलेले दिसून येतात.ह्या प्रजातीचा नैसर्गिक अधिवास नाशिक शहराजवळ भगूर परिसरात व जिल्ह्यात ठराविक ठिकाणीच दिसतो. काही ठिकाणी खोडाला खालूनच फांद्या फुटतात. शाखा उपशाखा भरपूर प्रमाणात असतात. फांद्यांना छोटे हुका सारखे अणकुचीदार काटे असतात. काटे लाल रंगाचे, बुड लांबट, रुंद व टोक उलट्या बाजुला हुकासारखे वळलेले असते. पान उपशाखांनवर असतात. पान म्हणजे पाच ते आठ छोट्या उपपर्णीकांच्या छोट्या जोड्या असतात. पानाची रचना बाभूळच्या पानांसारखीच असते. पर्णिका जाडसर असतात. पानगळ हिवाळ्याच्या शेवटी होते. फुलं गुलाबी रंगाची गोंडे असुन पुंकेसरांवर असलेल्या पांढरा माथा, यामुळे फुलं खूपच सुंदर व लक्ष वेधून घेणारी असतात. फुलं पावसाळ्याच्या सुरुवातीला येतात. फळ म्हणजे चपट्या शेंगा. शेंगा वक्र आकाराच्या व कडा जाड लालसर व कडांवर फांद्यांवर असतात तशाच रचनेचे काटे पण आकाराने छोटे असतात. शेंगांमध्ये तीन ते सहा बिया असतात. बियांच्या ठिकाणी शेंग फुगीर व तांबूस रंगाची असते. शेंगांणा चोची सारखे लांबट गोलाकार शेंडा निघालेला असतो. शेंगा पक्व झाल्यावर काळपट गडद तपकिरी रंगाच्या होतात. काही प्रजातींच्या फुलपाखरांसाठी उपयुक्त वृक्ष. निसर्गातील एक उपयुक्त वृक्ष असून. योग्य ठिकाणी लागवड करून संवर्धन करण्याची गरज आहे.

identity footer