हुम्ब

miliusa tomentosa

मध्यम, अधिक पावसाच्या प्रदेशात, मुरमाड, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत, उष्ण, कोरड्या हवामानात वाढणारा वृक्ष. उपलब्ध परिस्थितीनुसार, हुम्ब चाळीस ते पन्नास फूट वाढतो. बुंधा सरळ वाढणारा, साल गडद तपकिरी रंगाची, भेगाळलेली असते. पान एकांतरीत, साधी, साधारण चार ते सहा इंच लांब व अडीच ते तिन इंच रुंद, लहान देठ असलेले, देठाकडे गोलसर व पुढे बोथट किंवा अगदीच बारीक टोक निघालेले असतात. पान वरुन गुळगुळीत व खालच्या बाजूने काहीसे लवयुक्त असतात. पानगळ त्यात्या भागातील परिस्थिती नुसार डिसेंबर ते मार्च दरम्यान होते. तसेच वातावरणा नुसार नवीन पालवी जानेवारी ते एप्रिल दरम्यान येते. नवीन पालवी बरोबरच फुल येण्यास सुरुवात होते. फुलांची नैसर्गिक रचना सुंदर असते. फुल लांब देठ असलेली, पिवळसर,जांभळट, तपकिरी रंगाची असतात. फुलांना तिन निदल, सहा पाकळ्या असतात, बाहेरील तिन पाकळ्या खुपच पातळ लक्षात न येणाऱ्या व आतील तिन पाकळ्या मोठ्या, मोठ्या पाकळ्यांच्या मध्येभागी गडद जांभळ्या रंगाची रेष स्पष्ट दिसते. पुंकेसर असंख्य असतात. फळ लहान देठ असलेली, फळांचे घड असतात. फळ एक इंच गोलसर, सुरवातीला हिरवी व परीपक्व झाल्यावर जांभळट रंगाची होतात. फळ जुन मध्ये पिकतात. फळ खातात.

identity footer