अळव, मध्यम व जास्त पावसाच्या प्रदेशात वाढणारा छोटा वृक्ष. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत येणारा. अळव बहुतांशी मोठे झुडूपा सारखेच बऱ्याच ठिकाणी वाढलेले दिसते.काही ठिकाणी पंधरा ते वीस फुटापर्यंत वृक्ष वाढलेला दिसतो. सदाहरित वृक्ष पण जमिनीच्या प्रकारानुसार काही ठिकाणी अल्प काळासाठी पानगळ होते.अळव ला मोठे काटे असतात. काटे पानांन लगत दोन किंवा तीन च्या संख्येने एकमेकांनच्या विरुध्द दिशेने टोक वाढलेले असतात. काटे फांद्यांच्या रंगा सारखे च असतात. पान एकाच पेरावर , एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येतात. पान,आकाराने लहान मोठी, पसरट,थोडेसे लांबट टोक असलेले असतात. साधारण तीन ते पाच इंच मोठी. नवीन पालवी चकचकीत व गुळगुळीत असते. पानाचा वरचा भाग हिरवा व खालचा भाग फिकट हिरवा असतो. गळून पडलेल्या पानांनच्या जागेवर हिरवट रंगाची पाच पसरट पाकळ्या असलेल फुलांचे छोटे गुच्छ येतात. फुलण्याचा काळ फेब्रुवारी पासून ते एप्रिल पर्यंत असतो. पण मी, माझ्या वृक्ष परिचय केंद्रामध्ये अळव चा वृक्ष जुन मध्ये पण फुलांनी बहरललेला बघीतला आहे.फळ एप्रिल मे मध्ये येतात.फळ गोल, एक ते दिड इंच व्यासाची हिरवी फळ असतात. मे जुन मध्ये फळ पिकतात. पिकलेली फळं पिवळी होतात. परिपक्व झाल्यावर चिक्कु सारखी दिसतात.फळ पक्षांना आवडतात, फळांचा गर पक्षी कोरुन कोरुन खातात.फळ हे रानमेवा म्हणून खातात. इगतपुरी,त्रंबकेश्वर,हरसुल,पेठ ह्या भागात मे जुन मध्ये वाटे करून रस्ताच्या कडेने आदिवासी बांधव विकतांना दिसतात. वनांनमध्ये यांची संख्या कमी होत चालली आहे. औषधी गुणधर्म असलेला हा छोटेखाणी वृक्ष योग्य ठिकाणी लागवड करून संवर्धन करूया.