आदिवासींचा कल्पवृक्ष म्हणून ओळख असलेला, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढणारा विशाल, भरगच्च गोल पर्ण संभार असलेला चीकवर्गीय वृक्ष. मोह वृक्ष चाळीस ते पन्नास फूट उंच वाढतात. खोड खूजे मजबूत साधारण एक मिटर व्यासापर्यंत असते. खोडावरची साल जाड, तपकिरी काळा रंगाची, आडव्या भेगा पडलेल्या असतात. खोडावरच्या सालीवरच्या भेगांची रचना अशी असते की असं वाटतं की कोणीतरी याला मुद्दामून असे जागोजागी चिरून ठेवलेल आहे. अंतर साल लाल रंगाची असते, ईजा झाल्यास त्यातून पांढरा चिक बाहेर येतो. खोडाला चहू बाजुंनी अनेक फांद्या फुटलेल्या असतात. कवळ्या फांद्यांना लव असते. फांद्यांच्या टोकाला एकाआड एक साधी, चार पाच सेंटीमिटर देठ असलेली,लांबट गोलसर आकाराची मोठी पान वर्तुळ आकार पद्धतीने एकवटलेली असतात. पानांना टोक निघालेल असत व देठाच्या बाजूला निमुळती झालेली असतात. साधारण उन्हाळ्याच्या सुरुवातीला पानगळ होते, जमिनीच्या पोत नुसार पानगळी चा व नवीन पालवी येण्याचा काळ कमी जास्त असतो. नवीन पालवी फिकट तपकिरी रंगाची ज्यावेळेस वृक्षा वर दिसू लागते त्यावेळेस त्या मोहाच्या वृक्षाचे सौंदर्य काही औरच दिसते. परीपक्व पान जाडसर व गर्द हिरव्या रंगाची असतात. पानावर पिवळसर शिरा उठून दिसतात. खालच्या बाजूस पान फ्किकट हिरव्या रंगाची व जाड उठावदार पिवळसर शिरा असतात. ह्याच काळात पिवळसर पांढऱ्या रंगाच्या सुवासिक फुलांचा बहर सुरू होतो. गुच्छांनी ३ ते ४ सेंटीमीटर लांब देठ असलेली विशिष्ट रचनेची फुलं फांद्यांच्या टोकाला येतात. फुल रात्री उमलतात. फुलांच्या काळात झाडावर पक्षांची गर्दी असते. बहर मे महिन्या पर्यंत असतो. फुल खातात, त्यांना गोड चव असते. आधीवासी ह्या काळात ह्या फुलांना वेचून वाळवून साठवून ठेवतात. वेगवेगळ्या प्रकारे फुलांचा खाण्यामध्ये उपयोग करतात. फुलांपासून बनवलेला अर्क हा सांधेदुखी ,कफ, हृदय रोगासाठी उपयुक्त आहे. आदिवासी भागात यापासून दारू बनवली जाते. २.५ ते ५ सेंटीमीटर लांबट गोलसर फळ जुलै अखेरपर्यंत पिकतात. फुल व फळ पक्ष्यांना आवडतात. बियांपासून तेल मिळते. विशिष्ट दिवसांच्या आत आदिवासी लोक यातून तेल काढतात. मोहाचा आजुन एक प्रकार म्हणजे दक्षिण मोह. ह्याची पांन निमुळती आकाराने जांभळाच्या पानासारखी असतात. नाशिक मध्ये टाकळी रोड, गांधीनगरच्या मागे, मिथिला बंगल्याच्या आवारात हा एकमेव मोठा वृक्ष बघायला मिळतो. राशी वनात मीन रास व नक्षत्र वनात रेवती नक्षत्राचा आराध्या वृक्ष म्हणून ह्याची लागवड केली जाते. बहुगुणी असा हा मोह वृक्ष.