अमेरिकन खंडातील उष्णकटिबंधीय प्रदेशातील झुडुप वर्गीय प्रजाती. आपल्याकडे याला गुलतुरा/घाणेरी या नावाने ओळखले जाते. घाणेरी ह्या झुडपाला पुर्वी शोभिवंत झुडूप म्हणून आणले गेले. त्याच बरोबर पटकन वाढते व गुर खात नाही म्हणून बर्याच भागात, शेताला रस्त्याच्या बाजूने कुंपण म्हणून लावले गेले होते. पण शेती मध्ये त्याचे दुष्परिणामही हळूहळू जाणवु लागले. त्याचा आक्रमक वृत्तीमुळे तो गायरान, मोकळ्या पडीक जागा, व जगंल परीसरात पसरुन तेथील जैवविविधते वर परिणाम होऊन, पर्यावरणीय परिसंस्था बाधित होण्यास सुरुवात झाली. घाणेरी हा विविध प्रकारच्या वातावरणात व जमीनीत राहून जोमाने वाढतो. एकदा का एखाद्या ठिकाणी याच एखाद झुडूप वाढलं तर त्याच्या माध्यमातून बियाणं पसरून, तो भाग व्यापण्यास सुरुवात होते. याच्या बियांची उगवम क्षमता ही ९९% असते. ज्यामुळे ते स्थानिक वनस्पतींवर आक्रमण करण्यास सुरुवात करते. त्याला आधार मिळाल्यास ते त्या छोट्याखाणी वृक्षावर किंवा आपल्या स्थानिक झुडपांनवर पसरून त्याला झाकून टाकते, त्याच्या भारामुळे तो वृक्ष किंवा झुडुप वाढण्यास अडथळे निर्माण होतात. बऱ्याच ठिकाणी त्यामुळे वृक्ष किंवा झुडुप हे मृतप्राय होतात. त्याच बरोबर गवत वर्गीय वनस्पती त्या भागात वाढण्यास मर्यादा येते. त्यामुळे काही ठिकाणी तृणभक्षी वन्यजीवांना खाद्य मिळण्याची जागा कमी झाल्या कारणाने ते चराईसाठी शेतीत घुसून नुकसान होतांना दिसते. त्याच बरोबर घाणेरी सारख्या काटेरी झुडपांन मुळे वाघ, बिबट इत्यादी वन्यजीवांना रहाण्यास व शिकार करण्यास अडचणी येतात. त्याचा परीणाम म्हणजे ते आजुबाजुच्या जवळपास असलेल्या मानवी वस्तींन मध्ये पाळीव जनावरांच्या शिकारीसाठी शिरतांना दिसतात. तर काही ठिकाणी अश्या मनुष्यवस्तींन मध्ये, वन्यजीवांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी होऊन आपल्याला मानव व वन्यजीवांन मधील संघर्ष बघायला मिळतो. त्यामुळे असल्या उपद्रवी वनस्पतींचे वेळीच नियंत्रण करुन बाधीत होणाऱ्या पर्यावरणीय परिसंस्थेला शाबूत ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे.