कमी मध्यम पावसाच्या ठिकाणी डोंगराळ भागात, मुरमाड, खडकाळ जमिनीत वाढणारा पानगळी मध्यम वृक्ष. मध्यम उंचीचा वीस ते पस्तीस फूट वाढणारा ऑटोपशीर पर्णसंभार असलेला वृक्ष. खोड खपलीदार, ऋतूप्रमाणे त्याच्या खोडाच्या सालीवर बदल दिसून येतो. राखाडी रंगाची साल असते. पान संयुक्त पद्धतीचे, फांद्यांच्या शेंड्याला झुपक्याने येतात. पर्णिका विषम संख्येने सात ते नऊ असतात. पर्णिका देठ रहित किंवा अगदी छोटे देठ असलेल्या असतात. पण टोकाच्या पर्णिकेला देठ असते. पर्णिका काहिश्या पसरट व टोकाकडे निमुळते व टोक निघालेले असतात. नवीन पर्णिका ज्या डहाळीला चिकटलेली असतात ती लालसर रंगाची असते. पानगळ होऊन बरेच कालावधीपर्यंत वृक्ष निष्पर्ण असतो. हिवाळ्यात पानगळ होते व पावसाच्या सुरुवातीला पान येण्यास सुरुवात होते. पान फिकट तपकीर रंगाची, चकचकीत असतात. फांद्यांच्या शेंड्याला संख्येने सूक्ष्म हिरवट पिवळ्या फुलांचे तुरे, फेब्रुवारी मार्चमध्ये येतात. उन्हाळ्याच्या शेवटी फळ येण्यास सुरुवात होते. फळ हिरवे चकचकीत, लांब देठ असलेली गुळगुळीत कॅप्सूलच्या आकाराची फळ गोसाने लटकलेले असतात. फळ पिकल्यावर काळसर लाल रंगाचे होतात. फळ एकच बी असलेले,कठिण कवचाचे असतात. फळांना गर कमी असतो. त्यामुळे बी फळा पेक्षा थोडी छोटी असते. फळ पक्षांना आवडतात. या झाडापासून औषधी गुणधर्म असलेला डिंक मिळतो. आयुर्वेदामध्ये याचा विविध प्रकारे वापर केला जातो. आपल्या भागात याला स्थानिक भाषेत मदळ, शिंबट म्हणतात.