बोंडारा वृक्षापासून मिळणारा डिंक खाण्यासाठी उपयुक्त आहे. शोभिवंत पर्यावरण पूरक वृक्ष,उद्यानांमध्ये योग्य ठिकाणी वृक्षारोपण करून, संवर्धन केल्यास, परिसराची शोभा वाढेल व जैवविविधता टिकवण्यासाठी हातभार लागेल. त्रंबकेश्वर च्या पुढे जवाहर घाटात आणि खोडाळा रोडला काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला बोंडाराची नैसर्गिकरित्या वाढलेले वृक्ष आहेत. या वृक्षांचे शास्त्रीय नाव आहे, लॅगरस्ट्रोएमिया पर्वीफ्लोरा . मध्यम व अधिक पावसाच्या प्रदेशात पाण्याचा निचरा होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या जमिनीत वाढणारा वृक्ष. सरळ वाढणारे उंच खोड असते. सालीचे लांबट उभ्या खपल्या निघतात. अर्धवट निघालेल्या व गळण्याच्या स्थितीत खपल्या खोडाला लटकलेल्या असतात, त्यावेळेस खोड लक्ष वेधून घेते. पानगळ होणारा वृक्ष आहे. पान निमुळते आठ ते दहा सेंटिमीटर लांब, गुळगुळीत ,साधारण देठहीन, बुडाला गोलाकार, पुढच्या बाजूला निमुळते होत, टोक असलेली असतात. पानगळ हिवाळ्याच्या शेवटी होते. नवीन पालवी एप्रिल मे मध्ये येते. पांढरी सुवासिक फुले पावसाळ्यात येतात. फुलांची रचना अप्रतिम असते. निसर्ग कशाप्रकारे सुंदर रचना करतो व आपल्याला दाखवून आपले मन प्रसन्न करतो, व त्याच्या रचनेविषयी आपल्याला विचार करायला भाग पाडतो, त्या फुलांकडे बघून कळते. कोषात बसवल्यासारखे ,कॅप्सूलच्या आकाराचे साधारण एक इंच लांबीचे फळ असते. फळ हिवाळ्यात येतात व उन्हाळ्यात परिपक्व होतात.फळ शेंड्याकडून तीन भागात उकळतात. नैसर्गिक वस्तीस्थान कमी होत चाललेल्या हा वृक्ष प्रजातीची रोप वृक्ष लागवड करताना लावावित.