त्र्यंबकेश्वर पेठ हरसुल इगतपुरी भागात नैसर्गिकरित्या वाढलेला वृक्ष, नाना बोंडारा, काही प्रमाणात दिसून येतो. मध्यम व अधिक पावसाच्या प्रदेशात वाढणारा वृक्ष. सरळ उंच वाढणारा दाट पण ऑटोपशीर पर्णसंभार असलेला, पानगळ होणारा वृक्ष. जमिनीच्या प्रकारानुसार उंची व विस्तारामध्ये फरक असतो. खोड सरळ उंच वाढणारे पांढरट सालीचे. साल कागदासारख्या पापुद्राची गळून पडते. पाने वरून गुळगुळीत साधारण तीन इंच लांब व दीड ते अडीच सेंटीमीटर रुंद व टोकदार असतात. पानगळ हिवाळ्याच्या शेवटी होते. नवीन पालवी एप्रिलमध्ये येते. नवीन पालवी हिरवट तांबूस रंगाची असते. पानाच्या मागच्या बाजूच्या शिरा उठावदार असतात. जमिनीच्या स्तरानुसार पानगळीच्या कालावधीत फरक पडतो. पांढरी फुलं मार्च एप्रिल मध्ये येतात. नवीन पालवी बरोबर फुलण्याचा हंगाम असतो. असंख्य एक ते दीड सेंटीमीटर आकाराची छोटी फळ कॅप्सूल सारखी बोंड, डिसेंबर जानेवारीत झाडावर लटकलेली असतात. फळ तीन भागात उकळतात. पातळ पापुद्रा असलेल्या असंख्य बिया फळांमध्ये असतात. औषधी गुणधर्म असलेला हा शोभिवंत वृक्ष आहे.