मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात, मुरमाड, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढतो. जमिनीच्या प्रकारानुसार सदाहरित किंवा पानगळ होणारा वेल. खोड दोन ते अडीच इंच, काष्ठस्वरुप असते. जमिनीपासून खोडावर फांद्या असतात. फांद्याचा गुंता झालेला असतो. काही फांद्या आधार शोधण्यासाठी आठदहा फुट पसरलेल्या असतात तर काही आधार वृक्षावर वाढतात. पानं संमुख साधी, देठाकडे पसरट व पुढे निमुळती व टोक निघालेली असतात. पान चकचकीत व पानांच्या शिरा स्पष्ट दिसतात. काही पानांच्या कडा वळनदार असतात. पांढऱ्या शुभ्र, सुगंधी फुलांचा बहर उन्हाळ्याच्या सुरुवातीला सुरू होतो तर उन्हाळ्याच्या अखेर पर्यंत असतो. फुल जाईजुईच्या फुलांन सारखी दिसतात. फुलोरा मोठा असतो पण फुलोऱ्यात एका वेळी, एक ते पाचच्या संख्येने फुलं उमलले असतात. फुल साधारण दोन सेंटीमीटर लांब नळी युक्त, नळीच्या वरच्या भागात फुलांना पांढऱ्या शुभ्र सात ते आठ लांबट पाकळ्या असतात. उन्हाळ्याच्या अखेरीस वाटाण्याच्या आकाराची चकचकीत गोल फळ येतात.फळ हिरव्या चांदणी सारख्या कोंदणात आलेली छान दिसतात. फळ पिकल्यावर काळपट रंगाची होतात. औषधी गुणधर्म असलेला बहुवर्षायू वेल आहे.