खटखटी

grewia flavescens

खडकाळ, मुरमाड, हलक्या प्रतीच्या जमिनीत, उष्ण भागात वाढणारे मोठे झुडूप. आधार मिळाल्यास वेलीसारखे पंधरा ते वीस फुटापर्यंत वाढते व छान पसरते. याला मुख्य खोड असे नसते. फांद्यांचा जुडगा जमिनीतून वाढतो फांद्या जमिनीपासून चार ते पाच फूट सरळ उंच वाढून जमिनीकडे वळलेल्या असतात. जमिनीपासून फुटलेल्या जाड बारीक असंख्य फांद्या असतात. फांद्यांचा आकार आयाकृती असतो. पांढरट काळपट रंगाच्या उभ्या रेषांची साल फांद्यांना असते. त्यामुळे फांद्यांना वेगळीच रंगछटा असते. पानं दोन ते तीन इंच लांब आणि खूप लहान देठाची, देठाकडे पसरट व टोकाला निमुळती असतात. पानगळ साधारण फेब्रुवारी मध्ये होते. बऱ्याच काळ म्हणजे पावसाच्या आगमनापर्यंत झुडुप निष्पर्ण असते. चांगल्या जमिनीत पानगळ अल्पकाळासाठी होते. नवीन पालवी पावसाळ्याच्या सुरुवातीला येते फुलं फालसाच्या फुलांसारखी, पण थोडी छोटी असतात. फुलं एक ते दीड सेंटीमीटर चे पिवळा धमक रंगाचे सहा ते सात पसरट पाकळ्या टोकाला व मागच्या बाजूला वळलेले असंख्य पुंकेसर असलेली असतात. फुलं पावसाळ्यात जुलै ऑगस्टमध्ये येतात. फळधारणा हिवाळ्याच्या सुरुवातीला होते. फळ हिरवी देठ असलेली, गोडसर साधारण एक सेंटीमीटर व्यासाची लव युक्त असतात. एकाच देठाला, दोन अथवा तीन फळ एकमेकांना चिटकून वेगळा आकार तयार झालेला असतो. फळ हिवाळ्याच्या शेवटी परिपक्व होतात. त्यावेळेस गडद तपकिरी रंगाची होतात. त्यावर पांढरी केसाळ लव असते. वाळलेल्या फळांचे कवच कठीण असते. फळ पक्षांना आवडतात. काही पक्षी या दाट झुडपात घरटी करतात. सश्यासारख्या प्राण्यांना यांचा आसरा मिळतो. हलक्या प्रतीच्या जमिनीत डोंगर उताराला जमिनीची धूप थांबवण्यासाठी काही पक्षांना निवाऱ्यासाठी उपयुक्त असे पर्यावरण पूरक औषधी गुणधर्म असलेले झुडूप. स्थानिक वनस्पतींना हानिकारक ठरत असलेले परदेशी, अतिक्रमित घाणेरी सारखे झुडूप काढून अशा ठिकाणी खटखटी, कंथार सारखी झुडपं लावल्यास, पर्यावरणीय परिसंस्था अबाधित राहण्यास उपयुक्त ठरेल.

identity footer