पांढर फळी

flueggea leucopyrus

कमी मध्यम पावसाच्या ठिकाणी ,उष्ण कोरड्या हवामानात वाढणारे झुडूप. हलक्या प्रतीच्या जमिनीत, मुरमाड खडकाळ प्रकारच्या जमिनीत अत्यंत जोमाने वाढते. आठ ते दहा फुट वाढणारे पानगळी झुडूप. जमीनी पासून खोडाला फांद्या फुटलेल्या असतात. फांद्या सरळ वाढतात, काही फांद्यांवर काटे असल्या सारखे वाटते, पण ते सुकुन गळून गेलेल्या बारीक फांद्यांचा उरलेला भाग असतो. पान छोटे देठ असलेली गोलसर असतात. पान एक आड एक असतात.पान जाडसर,जमिनीच्या प्रकारानुसार साधारण एक इंच ते दोन इंच गोलसर, असतात. पान हिवाळ्याच्या शेवटी गळून पडतात. झुडूप निष्पर्ण होऊन नुसत्या वाळलेल्या सरळ वाकड्या तिकड्या काड्या असल्या सारखे वाटते.पान उन्हाळ्याच्या शेवटी येण्यास सुरुवात होते. पांनांन लगोलग पांनांच्या देठाजवळच छोटे पांढरट, पिवळसर,हिरवट फुल छोट्याश्या गुच्छांन मध्ये येतात.निरखुन बघितल्यास फुलांचे सौंदर्य लक्षात येते. जुन महिन्यात सुरवातीला पुर्ण फुलांनी बहरलेले झुडूप बघतच रहावे असे वाटते. फुलांनवर मधमाश्या गर्दी करतात. मे‍ ते जुलैपर्यंत फुलांचा बहर असतो.गळून पडलेल्या फुलांच्या जागेवर लहान देठ असलेली हिरवी गोल फळांचे घोस दिसु लागतात. लहान मोठे फळ असतात काही वाटाण्या येवढे असतात. हिरव्या फळांनी लगडलेले झुडूप खुपच छान दिसते. ऑगस्ट मध्ये फळ पिकतात. पिकलेली फळं पांढरी शुभ्र असतात. पांढर फळी झुडपाची पांढर्या फळांनी लगडलेली अवस्था बघण्यात सारखीच असते. फळ म्हणजे औषधी रानमेवा चवीला तुरट गोड लागतात. फळ पक्षांना आवडतात. औषधी गुणधर्म असलेला, डोंगर उताराला जमिनीची धूप थांबवण्यासाठी, ओसाड जमिनीवर लागवड करून कमी पाण्यात संवर्धनासाठी व तेथील पर्यावरणीय परिसंस्था शाबूत ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त झुडूप वर्गीय वनस्पती.

identity footer