मेडशिंगी हा औषधी गुणधर्म असलेला वृक्ष आहे. डॉलीकॅड्रोन फॅलकॅटा , हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. कमी मध्यम पावसाच्या प्रदेशात, डोंगर उताराला, मध्यम उंचीचा, ऑटोपशीर वाढणारा वृक्ष. उष्ण, कोरड्या हवामानात, खडकाळ, मुरमाड, हलक्या प्रतीच्या जमिनीत वाढतो. जमिनीच्या स्तरानुसार त्याची वाढ कमी जास्त होते. काही ठिकाणी मेडशिंगीच्या खोडाला, जमिनीलगतच फांद्या फुटून, मोठ्या झुडपा सारखे वाढलेले दिसून येते. चांगल्या पोषक जमिनीत तिस ते चाळीस फूट वाढलेला वृक्ष दिसतो. खोड वेडेवाकडे साल गडद तपकिरी भेगाळलेली असते. पान विषमदली संयुक्तपणे येणारी असतात. पानात दोन किंवा तीन पर्णिकांच्या जोड्या असतात. प्रत्येक जोडीचा आकार वेगळा असतो, व टोकाची पर्णिका मोठी असते. पर्णिका छोट्या व गोलसर असतात पानगळ हिवाळ्याच्या शेवटी होते. जमीन व वातावरणाच्या अनुसरून पाणगळीचा काळ कमी जास्त असतो. नवीन पालवी उन्हाळ्याच्या सुरुवातीला येऊ लागते. पालवी बरोबरच, पांढरी शुभ्र सुवासिक नळीयुक्त दीड एक इंच लांबीचे व तोंडाला पाच झालरयुक्त पसरट पाकळ्यांची फुलं चार ते पाच च्या संख्येने फांद्यांच्या शेंड्याला येतात. पावसाळ्यात शेंगा येण्यास सुरुवात होते. हिवाळ्यात म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये वेड्यावाकड्या एक ते दीड फूट लांबीच्या वाळलेल्या मेंढ्यांच्या शिंगासारख्या दिसणाऱ्या शेंगा लटकलेल्या असतात. औषधी गुणधर्म असलेला वृक्ष आहे. मेढशिंग सारखे वृक्ष डोंगर उतरायला जमिनीची धूप थांबवतात.