दुरंगी बाभूळ

dichrostachys cinerea

बाभूळ कुळातील छोटा वृक्ष म्हणजे दुरंगी बाभूळ त्याचे शास्त्रीय नाव आहे डायक्रोस्टॅचिस सायनेरिया कमी पावसाच्या प्रदेशात,कोरड्या हवामानात, उष्ण भागात, मुरमाड रेताड हलक्या प्रतीच्या जमिनीत वाढणारा, हा छोटा पण त्याच्या फांद्यांच्या रचनेमुळे छान दिसणारा काटेरी वृक्ष. काही ठिकाणी झुडपा सारखा वाढलेला दिसतो. लांबून पाहिल्यावर बाभूळ सारखा दिसतो. पानांची रचना बाभूळ सारखीच पण त्याच्या पर्णिका छोट्या असतात. हिवाळ्याच्या मध्यात त्याची पानगळ होते. पावसाळ्यात झाडांना फुले येण्यास सुरुवात होते. काही ठिकाणी फुलांचा हंगाम मार्चपर्यंत राहतो. दोन ते तीन इंचाची फुलं ज्यावेळेस झाडावर लोबू लागतात, त्यावेळेस त्या झाडाचे सौंदर्य खुलून दिसते. फुलांची रचना म्हणजे देठाकडे अर्धे फुल गुलाबी रंगाचे व पुढील बाजूस अर्धे पिवळ्या रंगाचे असतात. गुलाबी भाग हा बारीक लोकरीचा गोंडा असल्यासारखा तर पिवळा भाग हा तुऱ्यासारखा असतो. या झाडाच्या शेंगा दोन ते तीन इंचाच्या वेड्यावाकड्या वाळलेल्या असतात. दुरंगी बाभूळ मध्ये औषधी गुणधर्म आहेत. बऱ्याच ठिकाणी दुरंगी बाभुळची रोपे ही शमी वृक्षाची ची रोपे म्हणून विकत घेतली जातात. समाज माध्यमांवरील व्हिडिओमध्ये दुरंगी बाभूळ हे शमी वृक्ष म्हणून दाखवले जाते.

identity footer