कमी, मध्यम पावसाच्या प्रदेशात वाढणारा, वृक्ष. मुरमाड, खडकाळ, हलक्या प्रतीच्या जमिनीत पण वाढतो. जमिनीच्या प्रकारानुसार त्याची उंची कमी जास्त असते. खोड सरळ उंच वाढणारे, दाट पर्णसंभार असलेला,पानगळ होणारा,वृक्ष. साधारण चाळीस ते पन्नास फूट उंच वाढतो. पाने संयुक्त पध्दतीचे, पर्णिका लांबट गोल एक ते दीड इंच लांब व दोन ते अडीच सेंटीमीटर रुंद असतात. पर्णिका जाडसर,गुळगुळीत वरची बाजू गर्द हिरव्या रंगाची व खालची बाजू फिकट हिरवा रंगाची असते.पानगळ जानेवारी ते फेब्रुवारीत होते.पानगळीचा काळ जमिनीच्या प्रकारानुसार असतो. पानगळ होऊन पुर्ण बोडक झालेले झाड भरगच्च छोट्या फुलांनी बहरत त्यावेळेस खुपच अप्रतिम दिसते. लांबुन पांढरट फुलांचा मोहर वाटतो. जवळुन बघितल्यास फिकट जामुणी रंगाची छटा असलेले फुल दिसतात. फुलांवर असंख्य मधमाशांची गर्दी दिसून येते. झाडाखाली फूलांचा सडा पडलेला असतो. नवीन पालवी येण्यास सुरुवात होते. पोपटी रंगाची अलवार कवळी पान आणि काही ठिकाणी फुलांचे तुरे झाडावर असतात. खरच निसर्ग किती ह्या झाडाचे सौंदर्य खुलवतो आसे वाटते. वेगवेगळ्या अवस्थेत वेगवेगळे देखणेपण. फुलांचा हंगाम दोन एक महिने सुरू असतो.पावळ्याच्या सुरवातीला झाड हिरव्या दोन्ही बाजूने निमुळती टोकदार चपट्या लटकलेल्या असंख्य शेंगानी भरलेले असते. पानांनचा व शेंगांचा रंग अगदी सारखाच असल्या कारणाने, झाडा कडे निट बघितल्या शिवाय शेंगांचा अस्तित्व लक्षात येत नाही. हिवाळ्यात शेंगा वाळल्यावर काळपट तपकीरी रंगाच्या होतात व झाडा वर शेंगांचे घोस उठुन दिसतात.औषधी गुणधर्म असलेला, पर्यावरण पुरक वृक्ष. वृक्षरोपण करतांना ह्य वृक्षाचा विचार फार कमी प्रमाणात झालेला आहे.