आपण गोष्टींमध्ये चेटकीणीच्या फसव्या सौंदर्य विषयी वाचतच आलोय की ती सौंदर्याची भुरळ घालून ज्या पद्धतीने फसवणूक करते व नंतर आपलं खर घातक रुप दाखवते. हेच आपल्याला कॉसमॉस फुलांच्या बाबतीत म्हणता येईल.
कॉसमॉसची पिवळी, नारंगी रंगाची फुल सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये जेव्हा दिसू लागतात. त्यावेळेस प्रत्येकाला त्यांच्या सौंदर्याची भुरळ पडते, पण ते आपल्या इथल्या पर्यावरणीय परिसंस्थेसाठी, इथल्या प्रदेश निष्ठ वनस्पतींसाठी किती घातक, उपद्रवी आहे आणि आक्रमकतेने वाढणारी वनस्पती आहे हे बहुतांशी लोकांना अजून याची कल्पना नाही. कॉसमॉस ही सूर्यफूल कुळातील एक वनस्पती. हि मुळची अमेरीकन खंडातील. कॉसमॉस ह्या वनस्पतीचे काही प्रकार अमेरिकन खंडातून आपल्याकडे, सुरुवातीला नर्सरीमध्ये एक सुंदर फुलांची वनस्पती म्हणून आणले गेलेत. कॉसमॉस मध्ये विविध रंग व प्रकार आहेत. पण आपल्याला जे पिवळा आणि नारंगी फुलांचे ताटवे सप्टेंबर,ऑक्टोबर मध्ये इतरत्र दिसू लागतात, ते काही लोकांच्या अज्ञानामुळे. काही ठिकाणी लोकांनी हे फुल सुंदर दिसतात म्हणून, त्याचा कुठलाही अभ्यास न करता व उपद्रवी परिणामाचा विचार न करता याचे सीडबॉल करून रानात फेकलेत, आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टींवर न समजुन घेता असे काम केले जाते, आणि त्याचे घातक परिणाम नंतर दिसू लागतात. त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे, हा सल्फर कॉसमॉस फुलांचा जो ताटवा आपल्याला ठिकठिकाणी सप्टेंबर ,ऑक्टोबर मध्ये दिसतो. बऱ्याच ठिकाणी लोक या फुलांबरोबर हौसेने फोटो काढताना दिसतात. त्यांना ही वनस्पती आपल्या जैवविविधतेला किती घातक आहे याची पुसटशी सुद्धा कल्पना नाही. सल्फर कॉसमॉस वनस्पती प्रचंड प्रमाणात आपल्या डोंगरदऱ्यांमध्ये, पठारांवर वेगाने पसरत आहे व त्यामुळे तेथील, उपयुक्त किटकांनच्या पोषक वनस्पती व जनावरांसाठी जी प्रदेशनिष्ठ खाद्य वनस्पती असते, तिचा रास होत चाललेला आहे.
सल्फर कॉसमॉस हे आपल्या येथील पर्यावरणी परिसंस्थेच्या घटकांसाठी त्रासदायक आहे व अशा प्रचंड प्रमाणात वाढणाऱ्या वनस्पतींमुळे आपल्या येथिल जैव विविधतेसाठी, जैव साखळी शाश्वत रहाण्यासाठी आव्हानात्मक ठरत आहे. प्रत्येक ठिकाणी स्थानिक स्तरावर, सामुदायिक श्रमदान (Community work) करुन वेळीच तिचा नायनाट होणे गरजेचे आहे. हि वनस्पतीं ओळखून एकतर फुल येण्या अगोदरच काढण गरजेचे किंवा या दिवसांमध्ये जेव्हा फुलोरा येतो तिथे फुल सुकण्याच्या अगोदर ते फुलं काढून जर त्यांना नष्ट केले तर नक्कीच तिचा पसरण्याचा वेग कमी होईल व आपल्याला अशी घातक वनस्पती आटोक्यात आणण्यास मदत होईल. ह्यासाठी ग्रास कटर मशीन चा वापर केल्यास नक्कीच याला नष्ट करण्यास चांगली मदत होईल.
आता ही वेळ नक्कीच आली आहे की आपल्याला आपल्या स्थानिक निसर्गातील जैवविविधता राखण्यासाठी जागृत राहणं व त्यासाठी काम करण गरजेचे झाले आहे.
यावर आमच काम सुरू आहे.