गोंदण

cordia sinensis

गोंदण हा कमी मध्यम पावसाच्या प्रदेशात वाढणारा छोटा वृक्ष आहे. काही ठिकाणी झुडपा सारखा वाढलेला दिसतो. मुरमाड, दगड,गोटे असलेल्या जमिनीत, उष्ण, कोरड्या हवामानात हा वृक्ष वाढतो. जमिनीच्या पोतानुसार गोंदण काही भागात सदाहरित असतो, तर काही ठिकाणी पानगळ होते. नाशिक मध्ये माझ्या घरा जवळ, आपण केलेल्या वृक्ष परिचय केंद्रांमध्ये, कधीही पूर्ण निष्पर्ण झालेला नाही, सदाहरित राहिलेला आहे. खोड म्हणजे जाड पाच ते सहा फांद्यांचा समूह असतो. फांद्यांचा रंग तपकिरी, फांद्या उंच वाढुन जमिनीकडे झुकलेल्या असतात. पान लांबट लहान देठ असलेली देठाकडे निमुळती व टोकाला वर्तुळकार झालेली असतात. पानगळ साधारणता जानेवारीत सुरू होते फेब्रुवारीत वृक्ष निष्पर्ण होतो. उन्हाळ्यात नवीन पालवी येण्यास सुरुवात होते. फुलं छोटी पांढरट असतात. हिवाळ्यात येतात. फळ हिरवी एक ते दीड सेंटीमीटर लांब गोल, माथ्याला थोडी पसरट असतात. परिपक्व झाल्यावर भगव्या रंगाची गुळगुळीत होतात. देठ असलेल्या छोट्या हिरव्या कोंदनात भगव्या रंगाची झाडाला लटकलेली फळ छान दिसतात. फळांमुळे गोंदण छोटेखानी वृक्ष लांबून ओळखायला येतो. फळ एप्रिल मध्ये पिकतात. फळ पक्षांना आवडतात. रानमेवा म्हणून खाण्यास त्याचा उपयोग केला जातो. औषधी गुणधर्म असलेला छोटेखानी वृक्षाची माहिती सामान्यतः नसल्याने व त्याची रोप नर्सरीमध्ये उपलब्ध नसल्या कारणाने लागवड केली जात नाही. डोंगर उत्तराला वृक्षारोपण करताना लागवड करून संवर्धन केल्यास तेथील पर्यावरणीय घटकांना उपयोगी पडेल.

identity footer