मध्यम, अधिक, पावसाच्या प्रदेशात डोंगर उतारावर, टेकड्यांवर वाढणारा वृक्ष. मुरमाड पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत मध्यम उंचीचा तीस ते पस्तीस फूट उंच वाढतो. त्याला आपल्याकडे पाड्यावर दहीविसा म्हणतात. खोड सरळ काही ठिकाणी थोड वेड वाकडे पाहाव्यास मिळते. साल फिकट करड्या रंगाची, गुळगुळीत व मऊ असते. सालीच्या उभ्या पट्ट्या निघत असतात .कवळ्या फांद्या पांढरट तपकिरी रंगाच्या असतात. जमिनीच्या प्रकारानुसार पानांच्या आकारांमध्ये फरक असतो. काही ठिकाणी एक हाताच्या तळव्या एवढी, तर काही त्याहून मोठी बघावयास मिळतात. पान हृदयाकृती आकाराची असतात. पान जाडसर, थोडी कडक,वरून गर्द हिरवी व खालच्या बाजूस पांढरट रंगाची, लव युक्त, उठावदार शिरा असलेली असतात. नवीन पालवी येते ,त्यावेळेस मऊ,लव युक्त, फिकट तपीर रंगाची पानं छान दिसतात. नवीन पालवी वर्षभर टप्प्याटप्प्याने येत राहते. पावसाळ्यात जुनी पानं परीपक्कव होतात, तेव्हा खालच्या बाजूने तपकिरी रंगाची होतात. ही पानं पावसाळ्याच्या शेवटी व हिवाळ्याच्या सुरुवातीला गळून पडण्यास सुरुवात होते. मात्र झाड पूर्ण निष्पर्ण होत नाही. हिवाळ्याच्या मध्यात छोटी पांढरी फुले, गुच्छांनी पानांच्या बगलेत येतात. फळ एक ते दीड सेंटीमीटर गोल, लव युक्त देठ असलेले झालर युक्त कोंधनात ठेवल्यासारखे असतात. फळ सुरवातीला गर्द हिरवे, खालचे कोंदण, पांढरट हिरवट असते. फळ पिकल्यावर पिवळे होतात. फळांच्या माथ्यावर बारीक टोक निघालेले असते. परिपक्व फळ काळपट तपकीर रंगाची असतात. पाड्यांवर असा समज आहे की दहिवीसाची काठी हातात असल्यास चिडलेले वन्य जीव शांत होतात, हल्ला करत नाहीत. भरपूर औषधी गुणधर्म असलेला हा पर्यावरणपुरक वृक्ष आहे. अशा दुर्मिळ होत चाललेल्या वृक्षांची रोपे तयार करून त्याची माहिती, व रोप लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारी यंत्रणेने प्रयत्न करावेत. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी,पेठ, हरसुल या भागात, फार्महाऊस धारकांनी, आपल्या बगीचे मध्ये अशी स्थानिक प्रजातींची पर्यावरण पूरक झाड लावून जोपासना केल्यास, यांची संख्या वाढण्यास मदत होईल व पर्यावरणीय परिसंस्था अबाधित राहण्यास चांगली वातावरण निर्मिती होईल.