तीस ते पस्तिस फूट उंच वाढणारा वेड्यावाकड्या फांद्या पसरणारा भरगच्च पर्णसंभाराचा, कमी अधिक पावसाच्या प्रदेशात, डोंगरदर्यांवर, कुठल्याही प्रकारच्या, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढणारा हा अल्पकाळासाठी पानगळ होणारा वृक्ष. लांबट गोलाकार खरखरीत पान असतात. पांढरी सुवासिक छोटी फुलं फांद्यांच्या टोकाला मार्च एप्रिल दरम्यान येतात. फुलांवर मधमाशा घोंगावु लागतात. झाड मे मध्ये हिरव्या साधारण एक सेंटीमीटर गोल फळांनी लगडलेले असते. काही झाडांवर दोन ते अडीच सेंटीमीटर गोल फळ असतात. पिकण्याच्या सुरुवातीला फळांचा रंग काहिसा पांढरट पिवळसर असतो. पूर्ण पिकल्यावर फळ ही फिकट नारंगी रंगाची दिसतात. कच्च्या फळांचे लोणचे करतात. पिकलेल्या फळांची चव पण छान असते. पूर्वी जून जुलैमध्ये पिकलेल्या फळांचे वाटे विकायला यायचे. फळ पोष्टिक असतात फळ खाण्यासाठी झाडांवर पक्षांची रेलचेल दिसते. फळांमध्ये औषध गुणतत्व असल्याने,आयुर्वेदामध्ये याचा उपयोग केला जातो. पूर्वी विपुल प्रमाणात असलेली झाड, आता फार कमी प्रमाणात शिल्लक राहिली आहेत. त्यात मधल्या काळात वृक्षारोपण करताना चुकीच्या विदेशी वृक्ष लागवडीमुळे व आपल्या अशा या गुणवत्ता पूर्ण निसर्गाच्या समतोल राखणाऱ्या वृक्षांची लागवड वृक्षारोपण करताना विचारात न घेतल्यामुळे पर्यावरणीय परिसंस्थेची साखळी आबादीत राखण्यास आपण कमी पडलो. म्हणून आता वृक्षारोपण करताना अशा उपयुक्त वृक्षांची रोपे योग्य ठिकाणी लावुन संवर्धन करूयात.