वाळवंटी, उष्णकटिबंधीय प्रदेशात कोरड्या हवामानात,कमी पाऊस पडण्याऱ्या प्रदेशात, मुरमाड हलक्या प्रतीच्या जमिनीत आठ ते दहा फूट काटेरी व वेढा वाकडा वाढणारा हा वृक्ष आहे. पान छोटी ,द्विपर्णी किंवा त्रिपर्णी असतात. पानांच्या कडा दातेरी असतात. झाडाला पान फार कमी प्रमाणात असतात. काही अंतरावर फांद्यांना चिकटून त्याची पाने असतात. फुलं छोटीशी वीटकरी, लाल, रंगाची असतात. उन्हाळ्यात फुलं व फळ येतात. आयुर्वेदिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा हा छोटेखानी गुग्गुळ वृक्ष आहे. आयुर्वेदामध्ये गुग्गुळापासुन मिळणाऱ्या डिंकाचा वापर भरपूर औषधांमध्ये केला जातो. ह्या वृक्षाच्या औषधी गुणधर्मामुळे बऱ्याच प्रमाणात याची ओरबाडणूक झाल्याने सद्यपरिस्थितीत फार कमी ठिकाणी नैसर्गिक रित्या आढळून येतो. ज्या भागांमध्ये कमी पाऊस पडतो, व उष्ण हवामान आहे, पाण्याची उपलब्धता कमी आहे, अशा ठिकाणी त्यामुळे ज्यांच्या पडीत जमिनी आहेत. अशांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गुग्गुळाची लागवड करावी. पुढे हा एक चांगल्या प्रकारे कायमस्वरूपी उत्पादनचा स्रोत अश्या शेतकऱ्यांना होईल. गुग्गुळाच्या रोपांना संवर्धनासाठी कमी पाणी लागते.