अरणी
clerodendrum phlomidis

शेताला पूर्वी अरणीच्या झुडपांचे कुपन केले जायचे. हे एक मोठे झुडूप आहे. कमी व मध्यम पावसाच्या प्रदेशात, कोरड्या, उष्ण हवामानात वाढणारे झुडुप. मुरमाड, हलक्या प्रतीच्या जमिनीत पण चांगले वाढते. सात ते आठ फुटापर्यंत उंच व सात ते आठ फुटापर्यंत पसरलेले, भरगच्च बारीक शाखा उपशाखांनी भरलेले असते. अजून पण काही तुरळक ठिकाणी हे शेताच्या कुंपणावर दिसून येते.आरणी हे पानगळ होणारे झुडूप आहे. वातावरण व जमिनीच्या प्रकारानुसार पानगळीचा काळ कमी अधिक प्रमाणात असतो. पानगळ ही जानेवारी ते फेब्रुवारी ह्या दरम्यान होते. पान ही खेळातिल पत्यांच्या पानांन मधल्या इस्पिक आकाराची, पण कडा काहीश्या करवतीसारख्या असतात. पावसाळ्यात अरणीला शाखांच्या टोकाला पांढरी शुभ्र सुवासिक फुलं गुच्छाने येतात. पाच पाकळ्या असलेल्या फुलांमधून पाच लांबट लोंबलेले पुंकेसर असलेली फुलं सुंदर दिसतात. फुलांचा हंगाम जमिनीच्या सुपेकते नुसार डिसेंबर ते जानेवारीपर्यंत असतो. वटाण्यासारखी हिरवी फळ मार्चमध्ये पिकून सुरकुतलेली काळी होतात. फांद्यांपासून त्याची रोपे तयार करता येतात. औषधी गुणधर्म असलेले पर्यावरण पूरक हे झुडूप वृक्षारोपण करताना, परदेशी त्रासदाय झुडपांच्या घुसखोरीमुळे दुर्लक्षित राहून गेले आहे. ह्याची लागवड करुन संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचे आहे.