मध्यम अधिक पावसाच्या प्रदेशात, मुरमाड, खडकाळ, जमीन, वाढणारा हा सदाहरित भुत्या वृक्ष. चांगल्या प्रतीच्या पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत छान वाढतो. भरगच्च ऑटोपशीर पर्ण संभार असतो. खोड सरळ. खोडाला सात ते आठ फुटावर फांद्या फुटलेल्या असतात. फांद्यांचा भार जमिनीकडे झुकलेला असतो. पान लांबट गोलाकार थोडे लांबट टोक असलेल्या असतात. टोकाच्या बाजूने पानं काहीशी मागच्या बाजूला वळलेली असतात. कडा करवती असतात. काही पानांच्या कडांची बाजू झालरी सारखी वळलेली असतात. पानं चककणारी, पानांचा रंग वरून गर्द हिरवा व खालून फिकट असतो. असंख्य सूक्ष्म फुलांचे फुलोरे पानांच्या बगलेत येतात. फुल पांढरे हिरवट चांदणीच्या आकाराची असतात. जवळून पाहिल्यावर त्यांचे सौंदर्य लक्षात येते. एक प्रकारची कर्णफुलांची डिझाईन त्याला पाहून केली असावी की काय? असे वाटते. फुल एप्रिल मध्ये येतात. फुलण्याचा काळ ऑक्टोबर पर्यंत असतो. हिरवी गुळगुळीत कॅप्सूलच्या आकाराची व टोकाकडे बारीक टोक निघालेले फळ, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये येतात. फेब्रुवारी मार्चमध्ये पिवळी होऊन परीपक्व होतात. त्याला आदिवासी भागांमध्ये भुस्कट्या या नावाने ओळखले जाते. याच्या पाल्याचा औषधी उपयोग होतो. हा औषधी गुणधर्म असलेला पर्यावरण पूरक वृक्ष आहे. आपल्या आजूबाजूच्या वनांमध्ये त्याची संख्या कमी झालेली आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, हरसुल आदी भागांमध्ये फार्महाऊसचे लँडस्केपिंग करतांना, फार्महाऊस धारकांनी परिसरातील वातावरणाचा विचार करून तेथील प्रदेश निष्ठ लुप्त होत चाललेल्या वृक्षांच्या प्रजातींची लागवड केल्यास तेथील स्थानिक पर्यावरणीय परिसंस्था अबाधित राखण्यास मदत होईल.