किरमीरा

casearia graveolens

मध्यम,अधिक पावसाच्या प्रदेशात डोंगर उताराला, मुरमाड जमीनीवर वाढणारा छोटेखानी वृक्ष. तुरळक ठिकाणी घाटरस्त्याला लागुन, कडाकापर्यंत मध्ये वाढलेली दिसतात. काही ठिकाणी त्याचे शेंडे काही कारणाने तुटल्यामुळे तो झुडपा सारखा वाढलेला दिसतो. खोड सरळ वाढलेले, फांद्या आडव्या जमिनीला समांतर पसरलेले असतात. पान एका आड एक मोठी पसरट टोकाला थोडे टोक निघालेले असतात. पान साधारणता हाताच्या पंजा एवढी असतात. पानांच्या कडा बारीक दातेरी असतात. हिवाळ्याच्या मध्यात पानांचा रंग बदलण्यास सुरुवात होते. लालसर जांभळा रंगाची पिकलेली पान झाडावर दिसू लागतात. त्यामुळे छोटे खाणी वृक्ष इतर झाडांमधून उठून दिसतो. पिकलेली पान साधारणपणे फेब्रुवारी मार्चपर्यंत गळत राहतात. काही ठिकाणी त्यानंतर दीड ते दोन महिने वृक्ष निष्पर्ण असतो. हिरवट रंगाची छोटी फुलं गुच्छाने गळलेल्या पानांच्या जागेवर एप्रिलमध्ये येतात. मग नवीन पालवी फुटते फुलांना काहीसा दुर्गंध असतो. फळ मे जून मध्ये येतात. साधारणतः दोन सेंटीमीटर चे लांबट गोल आकाराचे फळांचे घड झाडावर दिसतात पिकलेले फळ पिवळ्या धमक रंगाचे छोट्या सुरकुत्या पडलेले पण चमकदार असतात. फळ तीन भागात उकलते, व त्यामधून गर्द केशरी रंगाची चकचकीत एक लांबट ओबडधोबड कॅप्सूलच्या आकाराची बी डोकावत असते. आदिवासी भागात या वृक्षाविषयी माहिती मिळाली की हा वृक्ष कुठल्याही बाजूला पडला तर त्याचे खोड कधी जमिनीला टेकत नाही, कारण त्याच्या जमिनीला समांतर वाढलेला फांद्या, त्या फांद्या खोडाला जमिनीपासून लांबच ठेवतात. हे वृक्ष वैतरणा, त्रंबकेश्वर, हरसुल व पेठ परिसरात सपाटीवर व डोंगर उत्तराला दिसतात.

identity footer