कमी पावसाच्या प्रदेशात कोरड्या उष्ण हवामानात वाढणारे साधारण सात-आठ फूट उंच व आजूबाजूला तेवढाच घेर पसरलेले काटेरी पर्णहीन झुडूप. फार कमी ठिकाणी पंधरा ते वीस फुटापर्यंत मानवी हस्तक्षेप नसल्याकारणाने हे छोटेखाणी वृक्षासारखे वाढते. हिरव्या रंगाच्या असंख्य चार ते विस मिलिमीटर आकाराच्या जाडीच्या काटेरी फांद्यांचा गुंता झाल्यासारखे हे झुडुप वाटते. पानं फारच छोटी लांबट झुडपावर विरळ ठिकाणी पावसाळ्यात अल्पकाळासाठी येतात. ज्यावेळेस हे झुडप भगव्या रंगछटाच्या फुलांनी बहरते , त्यावेळेस अप्रतिम दिसते. कारण त्याच्या फुलांची नैसर्गीक रचना आणि रंगछटा न्याहाळत राहावे एवढी सुंदर आहे. फुल हिवाळ्याच्या माध्य पासून एप्रिल पर्यंत येतात.काही ठिकाणी फुलांची भाजी करतात. बोराएवढी गोलाकार फळ पिकल्यावर लालसर रंगाची असतात. फळांचे लोणचे करतात. फळांना काही ठिकाणी खूप मागणी असते. फळ पक्षांना आवडतात. पिकलेली फळ मिळवणे म्हणजे एक संघर्षच असतो. काही भागात ह्या झुडपाची पूजा केली जाते. औषधी गुणधर्म असलेले हे झुडूप आहे. आपल्याकडे त्याला किरळ म्हटले जाते. पूर्वी आपल्याकडे काही उष्ण जसे सिन्नर, मालेगाव, बागलाण आधी तालुक्यातील भागात कमी अधिक प्रमाणात शेतीच्या बांधावर नैसर्गिकरित्या वाढलेले दिसायचे बरेच ठिकाणी त्याला काढून टाकण्यात आले आहे.आता अशा ठिकाणच्या काटवणांमध्ये हे काही भागात अल्प संख्येने बघायला मिळते. ह्या झुडपांची रोप अशा भागात वृक्ष लागवड करताना नक्कीच लावावे जेणेकरून हे नामशेष न होता याचे संवर्धन होईल.