पळस

butea monosperma

कमी, मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात वाढणारा पानगळीचा वृक्ष. मुरमाड, खडकाळ, हलक्या प्रतीच्या जमिनीत, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढणारा वृक्ष. कोरड्या , उष्ण हवामानात वाढतो. खरंतर ठरवलं होतं की पळस वृक्षा बद्दल काही लिहायचे नाही,वाटत होत पळस सर्वांना परिचित असा वृक्ष आहे.पण ज्यावेळेस कधी कधी शनिवारी किंवा रविवारी नाशिक देवराई बघायला काही लोक येतात, तेव्हा मी काही झाडे दाखवत असतो, ज्या वेळी लोकांना, पळस दाखवतो, त्यावेळी खुप लोकांची‌ प्रतिक्रिया, हेच का ते पळसाचे झाड पहिल्यांदाच बघतोय फक्त ऐकले आहे, पळसाला पाने तीन म्हणतात ते हेच का? असा प्रश्न ज्यावेळेस होतो, त्यामुळे या झाडाची माहिती संक्षिप्तपणे लिहिण्याचं ठरवले. ह्या वृक्षाविषयी भरभरून लिहिता येईल एवढे याच्यामध्ये गुणधर्म आहेत. पण आपण याची फक्त प्राथमिक गरजेपुरता माहिती घेऊ. मध्यम आकाराचा, डेरेदार पर्णसंभार असलेला वृक्ष. खोड सरळ वाढते, काही ठिकाणी शेंड्याकडील भाग तोड झाल्या मुळे खोड वेडेवाकडे वाढलेले असते. तपकिरी करड्या रंगाची साल असते. पान तिन मोठ्या गोलसर पर्णिकांची, बेलाच्या पांनांन सारखी रचना. पान जाडसर ,खरखरीत , वरतुन हिरवी व खालच्या बाजूने पांढरट हिरवट रंगाची असतात. पानगळीचा काळ, जमिनीच्या प्रकारानुसार, वातावरणा नुसार असतो. पानगळ काही ठिकाणी डिसेंबर जानेवारीत होते तर काही ठिकाणी मार्च मध्ये, पानगळ होत असतांनाच पळस सुंदर रचनेच्या, मनमोहक रंगाच्या फुलांनी बहरु लागतो. वृक्ष निष्पर्ण होतो त्यावेळी पुर्ण केशरी रंगाच्या फुलांनी बहरलेले पळस म्हणजे नजरेचे पारणे फेडण काय असतं ते कळत. त्यावेळी ह्या वृक्षावर मध खाणाऱ्या पक्षांची झुंबड उडालेली दिसुन येते. माझ्या वृक्ष परिचय केंद्रातला पळस सदाहरित आहे, त्याला मी कधीच निष्पर्ण झालेला बघीतला नाही,‌ त्यामुळे त्याला फुल पण फार कमी संख्येने येतात. मार्च एप्रिल मध्ये चपट्या लांबट लवयुक्त शेंगा लोंबलेल्या असतात. शेंग तीन ते चार इंच लांब व दिड एक इंच रुंद,असतात. शेंगेच्या टोकाकडे काहीसा फुगीर भाग असतो त्यात एकच किडणी च्या आकाराची बी‌ असते. मे मध्ये शेंगा गळून पडतात. पळसा पासून उपयुक्त डिंक मिळतो. पान, फुल, फांद्या, मुळ, साल ह्या वृक्षाचा प्रत्येक घटक अंत्यंत उपयोगी आहे. ह्या वृक्षापासून विविध प्रकारे रोजगार पण उपलब्ध होऊ शकतो.औषधी गुणधर्म असलेला, पर्यावरणीय परी संस्था अबाधित ठेवण्यासाठी उपयुक्त वृक्ष.

identity footer