कमी, मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात वाढणारा. मुरमाड, खडकाळ, हलक्या प्रतीच्या जमिनीत, डोंगर उतारावर, उष्ण, कोरड्या हवामानात वाढतो. पानगळीचा वृक्ष. सत्तर ते ऐंशी फुट वाढतो. खोड सरळ उंच खांबा सारखे. खोडांवर भरपूर काटे असतात. काटे कोणाच्या आकारचे, टोकदार असतात. काटे खोडाला साधारण इंच भर व्यासाचे इंच भर लांब अनकुचीदार झालेले असतात. कालांतराने काही खोडावरचे काटे गळून पडतात. फांद्या खोडाभवती वर्तुळाकार फुटलेल्या, व तिरप्या वरच्या दिशेने वाढलेल्या असतात. झाड जसे वाढत जाते तश्या जुन्या फांद्या गळून पडतात. फांद्यांच्या विस्तार हा झाडाच्या शेंड्याकडे जास्त असतो. पान हे लांब देठाचे, देठाच्या टोकाला पाच पर्णिका असलेले. पर्णिका लहान देठाच्या, लांबट टोकदार, पाच दिशेला पसरलेल्या असतात.पान उपफांद्यांच्या टोकाला असतात. हिवाळ्याच्या मध्यात पानगळ सुरू होते. हिवाळ्याच्या शेवटी वृक्ष निष्पर्ण होतो. काही ठिकाणी जानेवारीतच निष्पर्ण झालेला दिसतो. निष्पर्ण झालेला वृक्ष फेब्रुवारी मार्च मध्ये जेव्हा लालसर गुलाबी रंगाच्या फुलांनी भरगच्च बहरलेला असतो, तो नजारा काही औरच असतो. किती निरीक्षण केले तर मन भरत नाही.फुल मोठी हिरव्या नक्षीदार पेल्यात,लालसर गुलाबी पाच पाकळ्यांची व असंख्य पिवळसर पुंकेसर असलेली. खुप सुंदर रचनेचे फुल असतात. जमिनीच्या प्रकारानुसार फुलांच्या रंगांमध्ये हलकासा फरक पडतो. फुलांवर विविध मध खाणाऱ्या पक्षांची,किटकांची व मदमाश्याची रेलचेल असते. गळून पडलेल्या फुलांनवर पण काही प्राणी ताव मारतात.फळ बोंडवर्गीय , पाच सहा इंच लांबीचे असते.एप्रिल मे मध्ये पक्व झालेली फळ गर्द तपकिरी किंवा काळसर रंगाचे असतात. निसर्गातील घटकांना अत्यंत उपयोगी,औषधी गुणधर्म असलेला बहुगुणी वृक्ष.