कमी, अधिक पावसाच्या प्रदेशात, मुरमाड ,खडकाळ पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढणारा, मध्यम उंचीचा, दाट पर्णसंभार असलेला वृक्ष. याचे खोड फारसे उंच किंवा सरळ नसते. बऱ्याच ठिकाणी वेडा वाकडा वाढलेला दिसून येतो. साल काळसर तपकीरी रंगाची खडबडीत भेगाळलेली असते. अंतर साल गडद गुलाबी रंगची असते. फांद्या वेड्यावाकड्या पसरलेल्या, फांद्यांचे शेंडे जमिनीकडे झुकलेले असतात. पानं एकांतरीत, देठाकडे वर्तुळाकार, पानाच्या टोकाला खाच असते. पानं दुभागलेली असल्याने, पानांचे दोन भाग झाल्यासारखे वाटतात. पानांच्या लांबीपेक्षा रुंदी जास्त असते. पानवरच्या बाजूला गुळगुळीत हिरवीगार तर खालच्या बाजूने फिकट हिरवी आणि लव युक्त असतात. पानगळ हिवाळ्यात उपलब्ध परिस्थितीनुसार कमी अधिक प्रमाणात होते, काही ठिकाणी वृक्ष सदाहरित राहतो. फुलण्याचा काळ उन्हाळ्यात असतो. छोटी लक्षात न येण्यासारखी फुलं पानांच्या देठाजवळ येतात. पिवळसर पांढरी फुल, पाच निमुळत्या पाकळ्यांची असतात. फुलांवर मधमाशा गर्दी करतात. पावसाळ्यात वितभर लांबीच्या वाकड्या हिरव्या शेंगा दिसू लागतात. शेंगा उन्हाळ्यात गडद तपकीरंगाच्या होऊन परिपक्व होतात. प्रत्येक संगीत दहा ते विस चपट्या लंबगोल गडद तपकिरी रंगाच्या बिया असतात. अज्ञानामुळे बऱ्याच लोकांना असे वाटते की पांडवांनी शस्त्र ह्या वृक्षावर लपवली होती. औषधी गुणधर्म असलेला वृक्ष.