लहान पानांचा धावडा

anogeissus acuminata

मध्यम, जास्त पावसाच्या ठिकाणी उंच वाढणारा डौलदार वृक्ष. मुरमाड, खडकाळ, भागात वाढणारा, काटक, पानगळ होणारा वृक्ष.जमिनीच्या प्रकारानुसार वाढीत काही प्रमाणात फरक पडत असतो. खोड सरळ उंच वाढणारे,राखडी रंगाचे, पुर्ण वाढ झालेल्या वृक्षाला साधारण पंधरा फुटा नंतर फांद्यां फुटलेल्या असतात. तिन चार वर्षाचे रोप तयार झाल्यानंतर खोडाला, खोडाच्या सालीच्याच म्हणजे हिरवट राखाडी रंगाचे जाडसर अनकुचीदार काटे असतात. खोडाला काटे साधारण पुढील दोन तीन वर्ष म्हणजे वृक्षाच्या ठराविक वाढी पर्यंत असतात. नंतर गळून पडतात. पानगळ उन्हाळ्याच्या सुरुवातीला होते. पानगळीचा काळ वातावरण व जमिनीच्या स्तरानुसार बदलतो.पान साधारण एक ते दीड इंच लांब पाऊन इंच ते एक इंच रुंद,बारीक टोक निघालेले. नवीन पालवीचे फुटवे रेशमी केसांची दाट लवयुक्त असतात, नवीन पालवी पोपटी रंगाची लवयुक्त छान दिसते. प्रचंड संख्येने, सुक्ष्म फूलांचे दीड दोन सेंटीमीटरचे गोंडे उन्हाळ्याच्या सुरुवातीला झाडावर आपलं अस्तित्व दाखवत वृक्षांच्या सौंदर्यात भर घालतात.फुल सुकल्यानंतर हेच गोंडे फळांचे गोंडे होतात. फळ म्हणजे अलवार काट्यांचे गोंडे असतात. फळ चपट्या बिया विशेष ठेवणीत एकमेकांच्या आधाराने विसावुन गोंडा तयार झालेला असतो. परिपक्व झाल्यावर कोरडे गोंडे गळून पडतात.‌जमिनीवर पडलेले गोंडे गोळा करतांना हलकेच उचलावे लागतात. बर्याच वेळा उचलतांना गोंडे मोकळे होऊन, अगदी छोट्या चपट्या बिया विखुरतात. माझ्या वृक्ष परिचय केंद्रामध्ये लहान पानाचा धावडा मी पंधरा वर्षा पुर्वी लावलेला, छान उंच वाढलेला आहे. नाशिक देवराई व वनराईत पण आपण बरेच रोप लावली होती. आता छान वाढत आहेत.

identity footer