मध्यम, अधिक पावसाच्या प्रदेशात, मुरमाड, खडकाळ पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढतो. उष्ण, कोरड्या हवामानात वाढणारा अल्पकाळ पानगळ होणारा वृक्ष. खोड सरळ उंच वाढते. साल करड्या, पिवळसर रंगाची. सालीचे अनियमित खपल्या निघालेल्या असतात. पानं संयुक्त पध्दतीचे, साधारण पंधरा इंच लांब, तिन ते आठ पर्णिकांच्या जोड्या असतात. पर्णिकांना उप पर्णिकांच्या दहा ते वीस जोड्या असतात. उपपर्णिका साधारण पाव इंच लांब व दोन्ही बाजूला गोलाकार असतात. पानगळ उन्हाळ्याच्या सुरुवातीला होऊन लगेच उन्हाळ्याच्या मध्या येण्यास सुरुवात होते. नवीन पालवीनंतर फांद्यांच्या शेंड्याला, फुलोरे येतात. फुलोऱ्यांवर लांब देठ असतात व एकाच देठावर आठदहा कळ्या येऊन बारीक फुल फुलुन एकत्रित एक मोठं फुल असल्यासारखे दिसुन येते. फुल म्हणजे संख्येने पांढऱ्या रंगाचे मुलायम पुकेंसर असतात. फुल एप्रिल मे मध्ये येतात. फळ म्हणजे शेंगा, पावसाळ्यात येण्यास सुरुवात होते. हिवाळ्याचे शेवटी शेंगा परिपक्व होऊन तपकीर रंगाच्या होतात. शेंगा सात ते आठ इंच लांब. शेंगामध्ये प्रत्येक सहा ते दहा बीया असतात, प्रत्येक बी नंतर शेंग चिमटलेली असते. काळा शिरीष औषधी गुणधर्म असलेला, उपयुक्त वृक्ष आहे.