बेल

aegle marmelos

कमी, मध्यम पावसाच्या प्रदेशात, मुरमाड, दगड गोट्यांच्या, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढतो. बेल दाट पर्णसंभार असलेला, काटेरी, पानगळ होणारा वृक्ष. काही भागात अल्पकाळासाठी पानगळ होते. साधारण तिस फूटा पर्यंत वाढतो. खोड पांढरट, तपकिरी किंवा पिवळसर रंगाची खडबडीत,भेगाळलेली व म‌ऊ असते. खुप दाटीवाटीने फांद्या फुटलेल्या असतात. पाने एकाआड एक, संयुक्त पद्धतीचे, त्रिदलीय, चकचकीत व गुळगुळीत असतात. मधली पर्णिका मोठी, देठ असलेली व बाजुच्या दोन लहान देठरहीत असतात. पर्णिका चुरगळल्यास सुगंधी वास येतो. पर्णिका भाल्याच्या आकारा सारख्या. उपलब्ध परिस्थितीनुसार पर्णिकांच्या लांबी रुंदीत फरक असतो. पर्णिका तिन ते आठ सेंटीमीटर लांब व दोन ते चार सेंटीमीटर रुंद असतात. पानांच्या बेचक्यात लांब, सरळ, अणकुचीदार काटे असतात. पानगळ हिवाळ्याच्या शेवटी होते. नवीन पालवी उन्हाळ्याच्या मध्यात येण्यास सुरुवात होते. नवीन पालवी बरोबरच फुलांचा बहर येतो. हिरवट पांढऱ्या रंगाची, एक इंच व्यासाची सुगंधी फुलं असतात. चार ते पाच मासल पाकळ्या, हिरवट पिवळे पुंकेसर असतात.‌ पावसाळ्यात फळधारणा होते. फळ पाच ते पंधरा सेंटीमीटर व्यासाची, गोलसर किंवा लंबगोलाकृती असतात. फळ उन्हाळ्यात मळकट पिवळ्या रंगाची होऊन परिपक्व होतात. फळाचे आवरण टणक व आतील गर चिकट, त्यात असंख्य चपट्या बिया असतात. गर आंबटगोड व केशरी रंगाचा असतो. औषधी गुणधर्म, धार्मिक महत्त्व असलेला, बहुउपयोगी वृक्ष.

identity footer