कमी, मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात वाढणारा वृक्ष. मुरमाड,दगड गोटे असलेल्या, हलक्या प्रतीच्या जमिनीत, उष्ण , कोरड्या, हवामानात वाढतो. पानगळीचा, काटेरी वृक्ष. उपलब्ध परिस्थिती नुसार कमी अधिक उंचीचा होतो. खोड वेडेवाकडे, तर क्वचित सरळ वाढलेले असते. खोडाचा रंग गडद तपकिरी किंवा काळसर असतो. साल खडबडीत , वेडीवाकडी भेगाळलेली असते. वाळलेल्या सालीच्या पातळ लांबट पट्टे गळून पडतात. झाडावर लांबट रुंद बुडाचे, हूका सारखे लालसर तपकिरी रंगाचे तीक्ष्ण काटे असतात. पान बाभळीच्या पांनांन सारखीच दिसणारी. पान संयुक्त पद्धतीचे पर्णिका व उपपर्णिका असलेले. पण बाभळीच्या पांनांन पेक्षा लांब, पर्णिका पण लांबट व उपपर्णिका खूपच बारीक असतात. पर्णिकेवर उपपर्णिकांच्या चाळीस ते पन्नास जोड्या असतात. पानगळ हिवाळ्यामध्ये होते. जमीन व हवामानानुसार पानगळीचा काळ असतो. झाड निष्पर्ण होऊन बोडके होतात.पावसाळ्याच्या सुरवातीला नवीन पालवी फुटते. नवीन पालवी लगोलग पांढर्या रंगाच्या फुलांचे असंख्य तुरे झाडावर दिसु लागतात. तजेलदार हिरव्या नवीन पालवी व पांढर्या फुलांच्या तुरांमुळे झाडाला एक वेगळच सौंदर्य प्राप्त होतं.फुलांचा हंगाम दोन एक महिने सुरू असतो. हिवाळ्यात चपट्या लालसर तीन ते चार इंच लांब शेंगा झाडावर दिसू लागतात. शेंगा हिवाळ्याच्या शेवटी परिपक्व होतात. परिपक्व झालेल्या शेंगा फिकट तपकिरी रंगाच्या असतात. खैराचे लाकूड चिवट व कठिण असते. खैर वृक्षापासून पासून डिंक मिळतो, ह्याच्या लाकडापासून कात बनवला जातो. औषधी गुणधर्म असलेला, वन शेती साठी उपयुक्त असा हा वृक्ष. खैराचे आजुन दोन प्रकार आहेत. लाल खैर , शास्त्रीय नाव:- आकाशिया चुंद्रा(Acacia Chundra) आणि पांढरा खैर, शास्त्रीय नाव:- आकाशिया फेरुजिनिया(Acacia ferruginea).